मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली.
यंदा महाशिवरात्रीला मुंबईत तापमान तब्बल 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले असले तरी, शिवभक्तांचा उत्साह काहीसा कमी झालेला दिसत नाही. उन्हाची तमा न बाळगता भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. भक्तिभावाने ओथंबून दर्शनाच्या प्रतिक्षेत उभे असलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
हेही वाचा : घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची फ्री-स्टाईल हाणामारी!
मात्र, या प्रचंड गर्दीमुळे मंदिर प्रशासन आणि पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. काही भाविकांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. “गर्दीची पूर्वकल्पना असूनही सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत,” असे अनेक भक्तांनी सांगितले.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईतील शिवमंदिरांतही विशेष पूजा-अर्चा आणि भजनसंध्यांचे आयोजन करण्यात आले आहे “हर हर महादेव!” च्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावले आहे.