‘दादांची खुर्ची फिक्स..’, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, अजित पवारांच्या हजरजबाबी उत्तरानं पिकला हशा
मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विविध मुद्यांवर माहिती दिली. गंभीर विषयांबरोबरच या तिघांच्या खेळकर संवादानेही उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मिश्किल वक्तव्यावर अजित पवारांनी फिरकी टाकली. तर देवेंद्र फडणवीसांनी यावर सारवासारव केली. नेमकं काय घडलं ते सविस्तर पाहुयात.
या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी हलक्याफुलक्या शैलीत सरकारच्या स्थिरतेबाबत वक्तव्य केले. सरकारची टर्म नवी असली तरी टीम जुनी आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. पण अजितदादा उपमुख्यमंत्री फिक्स आहेत, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. तेव्हा यावर आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत अजित पवारांनी तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही. त्याला मी काय करू?" असं उत्तर दिलं. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर संपूर्ण सभागृहात आणखी जोरात हशा पिकला. देवेंद्र फडणवीस यांनी संवादात थोडी फोडणी टाकली. आमची रोटेटिंग चेअर आहे," असे फडणवीस म्हणताच पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.
हेही वाचा - पुण्यातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिकवेशन हे चार आठवड्याचे असणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकार सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार आहे, असेही तिघांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी ९ पानांचे पत्र सादर करून विविध मुद्दे उपस्थित केले असले तरी सरकार कामकाज रेटण्याच्या मानसिकतेत नाही, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याचा फोटोसमोर; छेड काढणारा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती
महायुतीत मतभेद नाहीत
महायुती सरकारमध्ये कोणताही अंतर्गत संघर्ष नसल्याचेही तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. आमच्यात ना कोल्ड वॉर आहे, ना मतभेद. सरकारने अधिवेशन पूर्ण करावे असा आमचा प्रयत्न आहे, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पण सरकारकडून या निर्णयाची फारशी दखल घेण्यात आलेली नाही. विरोधक काहीही आरोप करोत, आम्ही त्याला कामाने उत्तर देणार, असे शिंदे यांनी सांगितलं.