Explosion at Solar Plant: नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तहसीलमधील बाजार गावाजवळील चांदूर गावाजवळील एका सोलर प्लांटमध्ये गुरुवारी पहाटे मोठा स्फोट झाला. पहाटे साधारण 1 वाजताच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे कामगार व परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत त्या वेळी 900 ते 6000 कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्यरत होते. या स्फोटोत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले असून आठ ते नऊ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रुग्णालयात दाखल जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. स्थानिक पोलिस आणि बचाव पथके स्फोटानंतर लगेचच घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. एका जखमी कामगाराने सांगितले की, आम्हाला रिअॅक्टरमधून धूर येताना दिसला आणि आम्ही बाहेर पडलो. जवळपास 20-25 मिनिटे धूर निघत राहिल्यानंतर अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे 40-50 कामगारांना दगड लागून दुखापती झाल्या.
हेही वाचा - Pune Ganpati Visarjan 2025: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग जाहीर
ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. याच सोलर युनिटमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारचा स्फोट झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे या कंपनीतील सुरक्षा नियमांचे पालन आणि औद्योगिक मानकांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नागपूर ग्रामीणचे एसपी हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, पोलिस व आपत्कालीन पथके घटनास्थळी कार्यरत असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. स्फोटाचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. तांत्रिक बिघाड, निष्काळजीपणा किंवा इतर कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली याचा तपास सुरू आहे.
हेही वाचा - Cabinet Decisions: वडाळा-सीएसएमटी-गेटवे मेट्रो प्रोजेक्टला हिरवा कंदील; ठाणे, पुणे, नागपूरलाही मोठी भेट
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बचाव पथके कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि संरचनात्मक नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी कार्यरत आहेत. या भीषण घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.