गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात दोन महिन्यांत 9 हजार 920 बेशिस्त वाहन चालकांना दणका देण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वाहन चालकांकडून 67 लाख 17 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नववर्षाची सुरुवात होताच गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिस विभाग ॲक्शन मोडवर आले असून जानेवारी व फरवरी या दोन महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर जिल्हा वाहतूक विभागाने कार्यवाही करत 9 हजार 920 वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 67 लाख 17 हजार रुपयांच्या दंड वसूल देखील केला आहे. यामध्ये विनापरवाना धारक मोठ्या प्रमाणात आहेत. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या 5 हजार 153 लोकांवर कार्यवाही आली असून त्यांच्याकडून 30 लाख 9 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ट्रिपल सीट चालवणाऱ्या लोकांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून यामध्ये 768 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 7 लाख 64 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सिग्नल तोडणारे 227 लोकांवर कार्यवाही केली असून त्यांच्याकडून 1 लाख 13 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा? राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 203 जणांवर कार्यवाही करत त्यांच्याकडून 20 हजार 600 रुपये दंड घेतला तसेच 84 अल्पवयीन वाहन चालकांवर कार्यवाही करत त्यांच्याकडून 4 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ज्यांनी आपल्या वाहनाचे सायलेन्सर बदली करून मॉडिफाइड सायलेन्सर लावले अशा 25 वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 25 हजार रुपये दंड वसूल केला आहे. एकूण 9920 वाहनधारकांवर कार्यवाही करत त्यांच्याकडून 67 लाख 17 हजार रुपयांचा दंड गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी केला आहे अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक नागेश भास्कर यांनी दिली.