लातूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालांमुळे मानसिक तणावात गेलेल्या एका 32 वर्षीय विक्रीकर निरीक्षकाने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी लातूरमधील सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या नंदनवन लॉजमध्ये रामदास श्रीरामे (वय 32, मूळ रहिवासी कमलेवाडी, नांदेड) यांनी गळफास घेतला.
रामदास श्रीरामे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले होते की, ते अमरावती येथे प्रशिक्षणासाठी जात आहेत. मात्र त्यांनी सोमवारी लातूरमधील नंदनवन लॉजमध्ये खोली बुक केली. मंगळवारी लॉज मॅनेजरने दुसऱ्या दिवसाचा भाडे भरण्यासाठी दरवाजा ठोठावला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी अनर्थ घडल्याचा संशय आल्याने मॅनेजरने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
हेही वाचा - Navi Mumbai Crime : विवाहित महिलेशी प्रेमसंबंधांचा संशय, 25 वर्षीय तरुणाची रबाळे तलावात उडी
पोलिसांकडून तपास सुरू -
दरम्यान, गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता श्रीरामे यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पीआय साहेबराव नरवाडे यांच्या म्हणण्यानुसार, श्रीरामे यांनी शिक्षक म्हणूनही काम केले होते. ते स्पर्धा परीक्षा देत ते उच्च पद मिळवण्याच्या प्रयत्नात होते.
हेही वाचा - मालाडमध्ये शिक्षिकेचा क्रूरपणा! खराब हस्ताक्षरामुळे 8 वर्षांच्या विद्यार्थिनीच्या तळहाताला दिले पेटत्या मेणबत्तीचे चटके
बाल विकास प्रकल्प अधिकारीपदी निवड होऊनही अस्वस्थता -
रामदास श्रीरामे गेल्या पाच वर्षांपासून विक्रीकर निरीक्षक पदावर कार्यरत होते. अलीकडेच त्यांची नागपूर येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) पदासाठी निवड झाली होती. मात्र, एमपीएससीच्या अलीकडील निकालात समाधानकारक कामगिरी न मिळाल्याने ते तणावात होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ही घटना महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थ्यांवरील ताण आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न अधोरेखित करते.