मुंबई: महाराष्ट्रातील पोलीस भरतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाईच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यासाठी, 15 हजार 631 पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरती होणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. रिक्त पदे 1 जानेवारी 2025 पासून ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान भरली जातील. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: BEST Election 2025 : 'जनतेने त्यांना नाकारले'; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
'या' पदांसाठी होणार पोलीस भरती
या भरतीमध्ये एकूण 15 हजार 631 जागा भरल्या जाणार आहेत. यात, पोलीस शिपाई पदाच्या 12 हजार 399 जागा, पोलीस शिपाई चालक पदाच्या 234 जागा, बँड्समनच्या पदासाठी 25 जागा, सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या 2 हजार 393 जागा आणि तुरुंग शिपाई पदाच्या 580 जागांचा समावेश आहे.

वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांसाठी विशेष संधी
ज्या उमेदवारांचे वय 2022 किंवा 2023 मध्ये भरतीसाठी ठरवलेल्या मर्यादापेक्षा जास्त झाले आहे, त्यांना या भरतीत अर्ज करण्याची एकवेळची विशेष संधी देण्यात आली आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाची फी 450 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी 350 रुपये आहे. ही फी भरती प्रक्रियेच्या खर्चासाठी वापरली जाईल. तसेच, अर्ज प्रक्रिया, तपासणी आणि भरतीशी संबंधित इतर कामांसाठी बाह्य सेवा पुरवठादार कंपनी निवडण्याचे अधिकार अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष दल, महाराष्ट्र यांना देण्यात आले आहेत.