ठाण्यात जनता दरबारामुळे शिंदे-नाईक संघर्षाची ठिणगी
ठाण्यात जनता दरबारावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापले
मुंबई : ठाण्यात भाजप नेते व वनमंत्री गणेश नाईक यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराची घोषणा करताच शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात मंत्री गणेश नाईक 24 फेब्रुवारीला खारआळी येथील रघुवंशी हॉलमध्ये जनता दरबार घेणार आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
गणेश नाईक यांनी कोपरीतील भाजप कार्यक्रमात जनता दरबाराची घोषणा केली होती. त्यानंतर शिंदे गटाने नाईक यांच्यावर टीकेची झोड उठवली. एकनाथ शिंदे यांचा ठाणे आणि जिल्ह्यावर मजबूत प्रभाव असून, त्यांच्यासाठी ठाणे हे गड मानले जाते. अशा ठिकाणी नाईक यांचा जनता दरबार म्हणजे शिंदे यांना उघडपणे दिलेले आव्हान असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर ऐरोलीतील शिवसेना मेळाव्यात काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनामध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी "मी कधीही दरबारी राजकारण केले नाही," असा टोला लगावत नाईक यांना लक्ष्य केले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण पेटले आहे.
गणेश नाईक यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, जनता दरबाराला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. ठाण्यातील अनेक भागांत शिंदे गटाने पोस्टर्स लावून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर गणेश नाईक यांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, हा संघर्ष फक्त जनता दरबारापुरता मर्यादित नसून, आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दोन्ही नेत्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अनेक वर्षे ठाण्यात आपली पकड कायम ठेवली आहे. मात्र, गणेश नाईक यांच्या या पावलामुळे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.शिंदे गटाच्या टीकेनंतरही गणेश नाईक ठाम असून, त्यांच्या जनता दरबाराची तयारी जोरात सुरू आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. जनता दरबाराच्या निमित्ताने ठाण्यात राजकीय वातावरण तापले असून, नाईक आणि शिंदे यांच्यातील हा संघर्ष आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणार, हे निश्चित आहे.