Monday, September 01, 2025 12:54:23 PM

हेल्मेट सक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

हेल्मेट सक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

नागपूर : नागपूर शहरात हेल्मेट सक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट घालण्याचे नवे नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार चालकाबरोबर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, या सक्तीच्या निर्णयाला नागपूरमधील काही नागरिक आणि राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान, कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला अन्यायकारक ठरवत निषेध नोंदवला. पेठे यांनी म्हटले की, “हेल्मेट सक्तीचा निर्णय लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. नागरिकांना योग्य माहिती देऊन आणि त्यांना प्रोत्साहित करून सुरक्षिततेबाबत जागरूक करणे गरजेचे आहे. सक्तीचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.”

आंदोलकांनी सरकारकडून हेल्मेट सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. तसेच त्यांनी हा निर्णय लागू केल्यास मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. नागपूर शहरातील या आंदोलनामुळे हेल्मेट सक्तीच्या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा रंगली आहे. त्यामुळे, सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आता वाढत आहे.


सम्बन्धित सामग्री