डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर येथील डॉ. यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडांगणावर शनिवारी सकाळपासून क्रिकेट मॅचेस सुरू होत्या. या मॅचेसदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपक यंत्रणेमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या आवाजाचा त्रास होत होता. विशेषतः ग्रीन्स स्कूलच्या दहावीच्या परीक्षार्थींना याचा मोठा फटका बसला. त्यांच्यासाठी ही वेळ अभ्यासाची असून, प्रचंड आवाजामुळे त्यांना एकाग्रता साधणे कठीण जात होते.
रहिवाशांची तक्रार, पोलिसांची तत्परता
मॅचदरम्यान ध्वनिक्षेपकाच्या मोठ्या आवाजामुळे ग्रीन्स स्कूल प्रशासनाने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आयोजकांना ध्वनिक्षेपक बंद करण्यास भाग पाडले. याआधीही मिलापनगर रेसीडेंस वेल्फेअर असोसिएशन यांनी याबाबत पोलिस, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्याकडे तक्रार केली होती.
कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भात डॉ. तारा भवाळकरांचं मोठं विधान
वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न
क्रिकेट स्पर्धेमुळे केवळ आवाजाची समस्या नाही, तर वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्नही गंभीर झाला. क्रीडांगणाजवळ पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी आपली वाहने रस्त्यावर लावली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
शैक्षणिक संस्थांचे दुर्लक्ष
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ आणि पेंढारकर कॉलेज प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून योग्य उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
परिसरातील नागरिकांचा विरोध
मिलापनगर परिसर हा निवासी क्षेत्र असून अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे रहिवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या मॅचेससाठी योग्य नियोजन करून आवाजाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे, वाहतूक आणि पार्किंग समस्या सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.