मुंबई: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ आली असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. कोकाटेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे.
'अमित शाहांनी 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले त्यात कोकाटेंचं नाव'
मंत्री कोकाटे विधिमंडळात रमी खेळताना दिसले, त्याचा व्हिडीओ रोहित पवार यांनी व्हायरल केला. यावर कुणी रमी खेळतंय, तर कुणी आमदार निवासात मारामाऱ्या करतंय असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला आहे. अमित शाहांनी 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवलं त्यात कोकाटेंचं नाव असल्याचा खळबळजनक खुलासा राऊतांनी केला आहे.
'शेतकऱ्यांचं दुर्दैव, कृषी मंत्रीचं रमी खेळतायेत'
शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की कृषी मंत्रीचं रमी खेळतायेत अशी टीका बच्चू कडूंनी कोकाटेंवर केली. कृषी मंत्र्यांकडून काय अपेक्षा करायच्या ? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांसाठी समिती गठीत केली. कृषी मंत्र्यांकडून काय अपेक्षा करायच्या? एकीकडे शेतकरी लग्नात खर्च करतात म्हणून कर्जबाजारी होतात असं म्हणायचं आणि कृषिमंत्रीच रमी खेळत आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफीची तारीख होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील. येत्या 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम होईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
हेही वाचा: हल्ली कुणीही रमी खेळतं; माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर मंत्री सरनाईकांची पाठराखण
'शेतकरी मरतोय, कृषीमंत्री रमी खेळतोय'
भाजप वाल्यांनी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलंय. त्यामुळे यांना काम उरलेले नाही. म्हणून ते रमी खेळत आहेत किंवा अधिकार नसल्यामुळे यांना काही करायची इच्छा नसेल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला आहे. पुढे बोलताना, हे जनतेच्या बोकांडी बसलेलं नतभ्रष्ट सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही. कोणाचीच परवा नसलेलं हे सरकार आहे. शेतकरी कर्जाखाली जपलेला आहे. आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. आता पूर्णतः पिक विमा शेतकऱ्याला भरायचा आहे. मत घेण्यासाठी एक रुपयात विमा आता मात्र तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेत आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांकडून कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रमी अशी टीका आव्हाडांनी कोकाटेंवर केली आहे. तर ऑनलाईन गेमवर बंदी आणावी अशी मी सभागृहात मागणी केली असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या गेमवर बंदी का नाही आणली हे मला कळलं. त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना याचं व्यसन लागलंय असा खोचक टोला कैलास पाटील यांनी कोकाटेंना दिला आहे. तसेच शेतकऱ्यांबद्दल बोलायचं तर रमी खेळतात असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी कोकाटेंवर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांवर कारवाई करावी.अशी लोक मंत्री मंडळात नको अशी मागणी आनंद दुबे यांनी केली आहे.