बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असतानाच, सोशल मीडियावर मारहाणीचे व्हिडिओ आणि बंदुकांसह बनवले जाणारे रिल्स अधिकच संतापजनक ठरत आहेत. यावर विधानपरिषदेत जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सध्या अमानुष मारहाण करून रिल्स तयार केली जात आहेत, लोकांना माज आलाय,” अशा शब्दांत त्यांनी या घटनांचा निषेध केला.
जालन्यात अमानुष मारहाण, आरोपीला अटक
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा गावात जुन्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी सळईने चटके देत अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्षाच्या भावाला अटक करण्यात आली आहे. आरोपी भागवत दौड याने आपल्या भावाच्या सांगण्यावरून ही मारहाण केल्याचा आरोप आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून जखमीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा: भयानक! आधी लोखंडी रॉड गरम केला मग त्याच रॉडने एकाला चटके देत मारले
पंकजा मुंडेंचा इशारा – कठोर कारवाई होणार
या घटनेचा विषय विधानपरिषदेत उपस्थित होताच, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कठोर कारवाईचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, “मी संबंधित पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. या प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. बीडच्या शिरूर कासार प्रकरणावरही मी पालकमंत्री अजित पवार आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.”
शिरूर कासारमध्ये निर्घृण मारहाण, व्हिडिओ व्हायरल
बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील बावी गावातही अमानुष मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली जात असल्याचे यात दिसते. विशेष म्हणजे, त्याच्या तळपायावर बॅटने प्रहार केले जात आहेत. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला तरी पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.