Sunday, August 31, 2025 11:25:58 AM

रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; आरोपी अटकेत

पनवेलमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याचे फसवणूक करून 19 लाख रुपये उकळले. फेसबुकवर बनावट जाहिरात करून आरोपी अक्षय कलंगुटकरला पोलिसांनी ताब्यात घेतले.

रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक आरोपी अटकेत


पनवेल: रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल 19 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपी अक्षय कलंगुटकर याला अटक केली.

आरोपीने फेसबुकवर 'रेल्वेत नोकरी मिळवा' अशा प्रकारच्या बनावट जाहिराती टाकत अनेक बेरोजगार तरुणांना फसवण्याचा डाव रचला होता. या जाहिरातीवर विश्वास ठेवून फिर्यादी तरुणाने आरोपीसोबत संपर्क साधला. त्यानंतर आरोपीने त्याला रेल्वेच्या वेगवेगळ्या पदांवर नोकरी लावण्याचे बनावट आश्वासन देत वेळोवेळी 19 लाख रुपये उकळले.

पैसे घेतल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने फिर्यादीने संशय घेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान माहिती मिळाली की, आरोपी सीबीडी परिसरातील एका धाब्यावर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लगेच सापळा रचत आरोपी अक्षय कलंगुटकरला अटक केली.

हेही वाचा: 'दुश्मन बॉर्डरपारच नसतो; घरातही असतो' पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्रासह सहा जण अटकेत

पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, आरोपीवर याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो याआधीही फसवणूकप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगून आलेला आहे. तरीही त्याने फसवणुकीचा गुन्हा थांबवलेला नाही.

या प्रकरणातून पुन्हा एकदा फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर होणाऱ्या बनावट नोकरीच्या जाहिरातींबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणतीही नोकरी मिळवण्यासाठी एजंट किंवा सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

नागरिकांनी अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी:

-अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच अर्ज करावा
-कोणालाही नोकरीसाठी पैसे देऊ नयेत
-संशयास्पद व्यवहारांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी

पनवेल तालुका पोलिस अधिक तपास करत असून, आरोपीने आणखी किती जणांना फसवले आहे, याचा शोध घेतला जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री