पुणे: पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिसांचे तीन पथके त्याचा शोध घेत आहेत. यादरम्यान, फरार निलेश चव्हाणला पकडून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नांदेड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नांदेड सिटी येथील पोलिस ठाण्यात 'फरार आरोपी निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे' असा फोन आला होता आणि थोड्याच वेळात पोलिसांचे पथक तिथे पोहोचले. मात्र, फोन करणाऱ्याने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते; हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद
'या' हेतूने त्याने केला होता पोलिसांना फोन:
फरार आरोपी निलेश चव्हाणची माहिती दिल्यावर पोलिसांकडून बक्षीस मिळवण्याच्या हेतूने त्याने 112 वर पोलिसांना फोन केला होता. संतोष दत्तात्रय गायकवाड (वय:33) असे फोन करणाऱ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध नांदेड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोन करणाऱ्यांनी सांगितले की, 'आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाणला अटक केली आहे. त्याच्याकडे दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे', अशी माहिती दिल्यामुळे त्या व्यक्तीचा शोध सुरू झाला. अखेर तो किरकटवाडी येथील पानशेत रोडजवळील स्वागत हॉटेलमध्ये आढळून आला. यादरम्यान त्याची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्या व्यक्तीने खोटा कॉल केल्याचे निष्पन्न झाले.