सातारा: देशभरात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि गॅस सिलेंडरच्या अवाढव्य दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या किचनमध्ये जणू आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी साताऱ्यातील पोवई नाका येथे असलेल्या भाजी मंडईत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत भाजप सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.
भाकऱ्या थापून आंदोलन:
सातारा जिल्हा शक्ती अभियानांतर्गत राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात महिलांनी चूल मांडून, त्यावर भाकऱ्या थापून गॅस दरवाढीचा प्रत्यक्ष कृतीतून विरोध केला. संध्याकाळी चार वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. महिलांनी पारंपरिक कपड्यांमध्ये हातात पोस्टर्स घेत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'गॅस दरवाढीने घराचा गॅस बंद', 'महागाईचा स्फोट, सरकारचं मौन का?' अशा घोषणा परिसरात घुमू लागल्या.
सर्वसामान्य जनतेवर महागाईचा जबर ताण आला:
या वेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे म्हणाल्या, 'भाजप सरकार सत्तेवर येताना गॅस सिलेंडरचे दर कमी करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, महागाई कमी करू, अशी ग्वाही देत होते. मात्र, प्रत्यक्षात आज सर्वसामान्य जनतेवर महागाईचा जबर ताण आला आहे. स्वयंपाकघर चालवणे अवघड झाले असून, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे आम्ही हा अनोखा निषेध केला आहे.'
या आंदोलनात शहरातील विविध भागांतील महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांनी परंपरागत चुली पेटवून त्या वरती भाकऱ्या थापत, 'स्वयंपाक करताना आम्हाला गॅस परवडत नाही, त्यामुळे पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आलीय', असा स्पष्ट संदेश दिला.
गॅस दरवाढ त्वरित मागे घ्यावी:
महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, 'गॅस दरवाढ त्वरित मागे घेतली जावी, आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली जावीत. अन्यथा महिला रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडतील', असा इशारा यावेळी देण्यात आला.
नागरिकांचा स्वतःहून आंदोलनात सहभाग:
या आंदोलनाने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. भाजी मंडईत नेहमी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनादेखील या आंदोलनाचे गांभीर्य जाणवत होते. काहींनी तर स्वतःहून येऊन आंदोलनात सहभाग घेतला. साताऱ्यातील या अनोख्या आणि ज्वलंत आंदोलनातून महिला काँग्रेसने पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. या निषेधामागे केवळ राजकीय हेतू नसून, जनतेच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार आहे, हेही स्पष्टपणे जाणवत होते.