Sunday, August 31, 2025 04:49:03 AM

उपचाराऐवजी आधी पैसे भरण्याची अट? BJP आमदाराच्या PA च्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

आमदार अमित गोरखेंचे PA सुशांत भिसेंच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं. पण आगाऊ पैसे भरण्याची अट घालून हॉस्पीटलनं त्यांना ॲडमिट करण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

उपचाराऐवजी आधी पैसे भरण्याची अट bjp आमदाराच्या pa च्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
उपचाराऐवजी आधी पैसे भरण्याची अट? BJP आमदाराच्या PA च्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर १० लाख रूपयास्तव उपचार नाकारल्याचा गंभीर आरोप होत असून त्यामुळे एका गरोदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीच्या तातडीच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण दहा लाख रुपये आगाऊ भरण्याची अट घालून प्रशासनानं त्यांना ॲडमिट करण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

तनिषा भिसे यांना प्रसूतीसंबंधी त्रास जाणवू लागल्यानं त्यांचे नातेवाईक त्यांना तातडीनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण हॉस्पिटल प्रशासनानं उपचार सुरू करण्याआधी दहा लाख रुपये भरण्याची मागणी केली. कुटुंबीयांनी तत्काळ २.५ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली. तरी देखील हॉस्पिटल व्यवस्थापनानं ॲडमिट करण्यास नकार दिला. यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून हॉस्पिटल प्रशासनाला संपर्क करून रुग्णाला तातडीनं दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पण हॉस्पिटल प्रशासनानं मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचाही आदेश धुडकावला आणि रुग्णाची प्रकृती अधिक बिघडत गेली, असं कुटुंबियाचं म्हणणं आहे. 

हॉस्पिटलकडून काहीच सहकार्य मिळत नसल्याने कुटुंबीयांनी तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांची सिझेरियन प्रसूती झाली आणि त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. पण दीर्घ विलंब आणि शारीरिक त्रास वाढल्यानं तनिषा यांची प्रकृती खालावली आणि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Viral Video: ग्रामविकास मंत्र्याच्या मुलाची स्टंटबाजी; राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून केला स्टंट

आमदार अमित गोरखे यांनी या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अमित गोरखे म्हणाले की, ‘हे हॉस्पिटल एक ट्रस्ट म्हणून चालवलं जातं. गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी हे सेवाभावी संस्थेच्या रूपात कार्यरत असणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात इथं उपचारांसाठी मोठी रक्कम आगाऊ मागितली जाते. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा विषय मी येत्या अधिवेशनात मांडणार आहे.’

हेही वाचा - पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी 'ही' आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे

दरम्यान, या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी X वर पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री