Monday, September 01, 2025 01:13:44 AM

दादर अन् गिरगावात लागले काका-पुतण्याचे फलक

कार्यकर्त्यांनी दादर नंतर गिरगांव येथे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर लावत 'नवे युग नवे पर्व', असं म्हणत काका - पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.

दादर अन् गिरगावात लागले काका-पुतण्याचे फलक

महेंद्र जोइल. प्रतिनिधी. मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे युतीची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच, कार्यकर्त्यांनी दादर नंतर गिरगांव येथे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर लावत 'महाराष्ट्र व खासकरून मुंबई मराठी माणसाची होत आहे आणि यापुढे राहील', 'नवे युग नवे पर्व', असं म्हणत काका - पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले. 13 जून रोजी आदित्य ठाकरे आणि 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देतानाचे एकत्रित फोटो असलेले बॅनर युवासेना आणि ठाकरें प्रेमींकडून लावण्यात आले. 

'संदेश कशाला? मी बातमीच देईन' - उद्धव ठाकरे:

काही दिवसांपूर्वी, एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना, 'मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल?' असा प्रश्न विचारला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली, 'संदेश कशाला? मी तुम्हाला बातमीच देईन. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ'.

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार'. सध्या महाराष्ट्राच्या मनात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे असेच आहे. 'भविष्यात हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?' अशी जोरदार चर्चाही सुरू आहे आणि असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

पुतण्याचा काकांना सल्ला:

5 जून रोजी मनसे नेते आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी ठाकरे युतीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. अमित ठाकरे म्हणाले की, 'मला असं वाटतं त्या दोन भावांनी एकमेकांशी बोलले पाहिजे, फक्त आम्ही बोलून काहीच उपयोग नाही. मला काही हरकत नाही जर दोन भाऊ एकत्र आले तर, पण मी 2014आणि 2017 पाहिले आहे. 2014 ते 2017 सोडा, मी कोव्हिड काळात पाहिले आहे जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज साहेबांनी उद्धवजींना पहिला फोन केला होता. हा भयानक आजार आपल्यावर आला आहे. सरकार कोणतेही असो, आपण त्यांची साथ दिली पाहिजे'. 

पुढे मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले की, 'बऱ्याचदा मी त्यांचे फोन कॉल्स बघितले आहेत. मला असं वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून युती होत नाही. मला असं वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. ते बोलू शकतात. शेवटी ते दोन भाऊ आहेत. बोलतील ना ते एकत्र'.

जुने वाद विसरून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होत असून दोन्ही बाजूंकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. 'महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास आम्ही तयार आहोत', अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्याचप्रमाणे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आपले मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी करत आहेत.


 


सम्बन्धित सामग्री