मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या सर्वांना पक्षातून काढून टाकण्याची मोठी कारवाई मनसेतर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीची एक्स पोस्ट मनसे अधिकृत हँडलवर करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह चौघांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर कोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी मनसे पक्षातून बडतर्फ केले आहे. मनसेकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा : WhatsApp Wedding Card Scam: 'लग्नाला नक्की या' असा छोटासा मेसेज, क्लिक करताच गायब झाले लाखो रुपये
वैभव खेडकर- (खेड, रत्नागिरी), अविनाश सौंदळकर- (राजापूर, रत्नागिरी), संतोष नलावडे- (चिपळून -रत्नागिरी), सुबोध जाधव (माणगाव- रायगड) या कोकणामधील नेत्यांवर पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचा तसंच पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वैभव खेडेकर हे मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरेंसोबत होते. पण गेल्या काही महिन्यांपासून वैभव खेडेकर मनसेची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी दापोलीमध्ये झालेल्या महायुतीच्या कार्यक्रमात ते दिसले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर त्यांना शिंदे गटाकडून देखील ऑफर देण्यात आली होती
दरम्यान, मनसेच्या कारवाईनंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेत खंत व्यक्त केली. 'बडतर्फ केल्याचे पत्र वाचून खूप दु:ख झाले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे. राजसाहेब आपण फार घाई केली. तुम्ही कालही मनात होता, आजही आहात आणि उद्याही राहाल. 30 वर्षे पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो. आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक लागला. हे पत्र पाहून मला धक्का बसला. मला कधीही अपेक्षित नव्हतं. मी अजून निर्णय घेतला नाही. पण आता मला पुढील निर्णय घ्यावा लागेल.'