Raj Thackeray Warns Fadnavis: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रावरून पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीची भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोड येथे आयोजित सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरे म्हणाले, 'शाळांमध्ये पहिली ते पाचवीत हिंदी सक्ती केली जाणार, असा निर्णय घेणं म्हणजे मराठी जनतेच्या भावना दुखावणं आहे. मुख्यमंत्री जर हिंदीसाठी इतकेच झगडत असतील, तर महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी काय करत आहेत? जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर मी दुकानेच नाही, तर शाळाही बंद करून दाखवेन'.
यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न केला; 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतो आहे? मराठी भाषेसाठी का नाही?'
त्रिभाषा सूत्रावरून विरोध
राज ठाकरे म्हणाले की, त्रिभाषा सूत्राचा गैरवापर करून हिंदी सक्ती केली जात आहे. 'राज्य सरकारने आधीच हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता, पण आता पुन्हा तसाच प्रयत्न केला जात आहे. याआधी मराठी जनतेच्या दबावामुळे सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला होता. इतिहास पुन्हा तसाच होणार आहे,' असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा: 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' -राज ठाकरेंचा संताप
फडणवीसांना दिलं थेट चॅलेंज
'मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की तिसरी भाषा हिंदी करणार म्हणजे करणार; मग मी देखील सांगतो, करायला पाहा… महाराष्ट्रातील शाळा आणि दुकाने बंद करून दाखवेन,' असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला.
त्यांनी स्पष्ट केलं की, मराठी माणूस कधीही आपल्या अस्मितेवर घाला सहन करणार नाही. 'हा केवळ भाषेचा नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कोणीही मराठीवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल,' असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
मुंबईवरून वाद
राज ठाकरे यांनी मुंबईच्या इतिहासाची आठवण करून दिली. 'मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा झाला. त्यावेळी काही गुजराती व्यापारी आणि नेते मुंबईला वेगळं करण्याच्या मागे होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनीसुद्धा मुंबई महाराष्ट्राला देऊ नका, असं मत मांडलं होतं, ही बाब आज अनेकांना माहित नाही,' असं राज ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, 'गुजराती नेत्यांचा डाव आजही सुरू आहे. हिंदी सक्तीचा मुद्दा फक्त सुरुवात आहे. पुढे जाऊन मुंबईवर ताबा मिळवण्याचा हा कट आहे.'
हेही वाचा: Vidhan Bhavan Clash: विधानभवनात मारहाण करणारा ऋषिकेश टकले नेमका आहे तरी कोण?
आंदोलनाचा इशारा
राज ठाकरेंनी सांगितलं की, महाराष्ट्रातील जनता शांत राहणार नाही. 'हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मराठी जनतेला हे स्वीकारार्ह नाही,' असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
केंद्र सरकारवरही टीका
राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. 'केंद्र सरकारवरून राज्य सरकारवर दबाव येतोय का? का हिंदीसाठी एवढं प्रेम दाखवलं जातंय? हे काँग्रेसपासून सुरू आहे आणि आता भाजप देखील तेच करत आहे,' अशी टीका त्यांनी केली.