मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती आणि त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं पाहायला मिळालं. विशेषतः मराठी भाषेच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या निर्णयाविरोधात जनआंदोलनाचा सूर उमटत होता. अखेर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यावर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विजयाचं जल्लोषात स्वागत करत मुंबईत भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन केलं. वरळीतील डोम मैदानावर असलेल्या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणं. यावेळी राज ठाकरेंनी थेट भाजपावर निशाणा साधत सत्तेची सीमा कुठपर्यंत मर्यादित आहे हे ठणकावून सांगितलं.
हेही वाचा: 'मी मराठी शिकणार नाही' म्हणणं पडलं महागात; मनसे कार्यकर्त्यांकडून केडियांच्या ऑफिसची तोडफोड
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात भाषणाच्या सुरुवातीलाच ‘सन्माननीय उद्धव ठाकरे’ असा उल्लेख करत त्यांच्या उपस्थितीचा मान राखला. मराठी भाषेसाठी महाराष्ट्र एकवटतो हे दाखवण्यासाठी आज मोर्चा निघायला हवा होता, असं मत त्यांनी मांडलं. 'मोर्चा निघायच्या आधीच सरकारने GR मागे घेतला, यावरूनच आपली ताकद दिसून येते,' असे ठाकरेंनी सांगितले. मेळाव्याचं आयोजन शिवतीर्थावर व्हायला हवं होतं, असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आले, त्याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, 'जे बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी आमचं एकत्र येणं घडवून आणलं.' हिंदी सक्तीच्या निर्णयावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, 'हे अचानक हिंदी कुठून आलं? लहान मुलांवर जबरदस्ती का? मुलं हिंदी चित्रपटात काम करणार आहेत का?'
हेही वाचा:Raj-Uddhav Thackeray Victory Rally: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर; विजयी मेळावा की नवीन राजकीय युतीचा श्रीगणेशा?
'तुमच्याकडे सत्ता आहे विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर,' असे शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला. दादा भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, 'तुमचं ऐकून घेईन, पण ऐकणार नाही.'
राज ठाकरे यांच्या या भाषणाने केवळ सरकारलाच नव्हे, तर जनतेलाही एकजूट आणि भाषिक अस्मितेचं महत्त्व पटवून दिलं. मराठीसाठी उभं राहणं म्हणजे केवळ भाषेचं नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण आहे, असा संदेश त्यांनी त्यांच्या भाषणातून जनतेला दिला.