Ram Navami 2025: अयोध्येचा राजकुमार असूनही प्रभू श्रीरामांच्या जीवनात आलेल्या हालअपेष्टांची संख्या अक्षरशः थक्क करणारी आहे. देवत्व लाभलेला असला तरी माणूस म्हणून त्यांना आलेली दुःखं, संघर्ष, आणि त्याग यांचा इतिहास म्हणजेच रामायण. श्रावणकुमाराच्या पालकांच्या शापातून जन्मलेले राम बालपणातच गुरुगृहात जातात, साधे जीवन जगतात. लाकूड वेचणे, पाणी भरणे ही कामं करत शिक्षण घेणाऱ्या रामाचा आयुष्याचा प्रवास कठीणच ठरतो.
राजकुमार असूनही त्यांना बालवयातच राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी विश्वामित्रासोबत वनात जावे लागते. नंतर विवाहानंतर सिंहासनाच्या उंबरठ्यावर असताना, कैकयीच्या हट्टामुळे चौदा वर्षांचा वनवास त्यांच्या वाट्याला येतो. त्याग, समर्पण, संयम यांचे प्रतीक बनलेले राम, पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मणासह वनात जातात. तिथे असुरांचा नाश, साधू-संतांचा उद्धार आणि शेवटी सीतेचं अपहरण या साऱ्या घटना त्यांचं जीवन अधिकच कठीण करतात.
सीतेच्या शोधात आकाशपाताळ एक करत राम रावणाचा वध करतात, पण अयोध्येला परतल्यावरही शंका-कुशंका त्यांच्या आयुष्यात शांतता येऊ देत नाहीत. एका नागरिकाच्या शंकेमुळे राम पुन्हा एकदा सीतेपासून दूर होतात. सीता वनात जाऊन राहते, लव-कुशाचा जन्म तिथेच होतो. रामराज्य चालवत राम एकल पालकत्व निभावतात, परंतु वैयक्तिक आयुष्यातील दुःख अंतःकरणात दडवतात.
शेवटी जबाबदाऱ्या पूर्ण करून राम शरयू नदीत आपले अवतारकार्य संपवतात. रामाचे जीवन म्हणजे आदर्श पुरुषाचं जीवन, ज्याने आयुष्यातील प्रत्येक संकट संयमाने, विवेकाने, आणि नीतिमत्तेने सामोरं जाऊन जगाला एक रामराज्य दिलं. आजच्या काळात, रामासारखा आदर्श आपल्यात उतरवण्याची गरज आहे – संकटं येतातच, पण त्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जात, प्रेम, निष्ठा आणि न्यायाचं पालन करणं हाच खरा ‘राम’ आपल्या आयुष्यात आणणं होय.