पिंपरी चिंचवड : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितल्याने एका गर्भवती महिलेला योग्य वेळी उपचार मिळालं नाही. त्यामुळे महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी केला आहे.
दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे. दहा लाख रूपये जमा न केल्याने तिच्यावर उपचार करण्यास तेथील हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला. या प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी आवाज उठवला आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; राज्य महिला आयोगाकडून घटनेची दखल
नेमकं प्रकरण काय?
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांच्या सोबत धक्कादायक घटना घडली आहे. सुशांत भिसे हे अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे ही गर्भवती असल्याने तिला तातडीने सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबीयाकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. मात्र कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असे सांगितले. त्यानंतर दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवतीला उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवले होते. त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. त्या जुळ्या बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी संदर्भात येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील अमित गोरखे यांनी केली आहे.