मुंबई: 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोठा आणि कधीही न विसरणारा बॉम्ब स्फोट झाला होता. तब्बल 17 वर्षांनंतर, पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त) यांच्यासह, 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी खळबळजनक दावा केला आहे.
हेही वाचा: चहावाल्याची अनोखी देशभक्ती, 'वीरबंधनम'च्या माध्यमातून 35 हजार राख्या आणि भव्य तिरंगा लष्कराला सोपवणार
मोदींचं नाव घेतलं तर...
साध्वी प्रज्ञासिंह यांनी प्रतिक्रिया दिली की, 'एटीएस अधिकाऱ्यांनी मला 13 दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या अटकेदरम्यान मला इतकी यातना आणि अत्याचार सहन करावे लागले की त्यासाठी शब्द कमी पडतील. मी माझी पूर्ण गोष्ट लिहित आहे, या सर्व गोष्टी त्यात लिहिल्या जातील. पण, सत्य नेहमीच बाहेर येते. त्यांनी मोदींचेही नाव घेतले होते. मी गुजरातमध्ये राहत होते. म्हणून, ते मलाही मोदींचे नाव घेण्यास दबाव आणत होते. यासह, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांच्यासारख्या लोकांची नावे घेण्यासाठी मला भाग पाडले जात होते. ते म्हणत होते की, या लोकांची नावे घेतली तर आम्ही तुला मारणार नाही. मात्र, मी कोणाचेही नाव घेतले नाही. ते मला सर्व काही खोटे सांगण्यास सांगत होते'.
नेमकं प्रकरण काय?
29 सप्टेंबर 2008 रोजी अनेकजण रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात मग्न होते. या दरम्यान, रात्री 9:35 वाजल्याच्या सुमारास भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला होता. यात 6 जण ठार झाले आणि 101 जण जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात हा प्रकार घडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी, साध्वी प्रज्ञा सिंह चंद्रपाल सिंह ठाकूर उर्फ स्वामी पूर्णचेतानंद गिरी, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर, अजय उर्फ राजा राहिरकर, सुधारावली पानवडेकर उर्फ राजा रहिरकर, दिवंगत पानसरे, दि. अमृतानंद देवतीर्थ आणि सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर यांना अटक करण्यात आले होते. मात्र, पुराव्याअभावी तब्बल 17 वर्षांनंतर साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त) यांच्यासह, 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.