Monday, September 01, 2025 07:15:14 AM

बीडमध्ये 843 महिलांची गर्भपिशवी काढावी लागली, तर 1523 गर्भवतींच्या हातात कोयता; महिला ऊसतोड कामगारांचं धक्कादायक वास्तव उघड

बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढली गेल्याचे उघड; 1523 गर्भवती महिला ऊसतोड करताना आढळल्या. आरोग्य, हक्क, आणि व्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर.

बीडमध्ये 843 महिलांची गर्भपिशवी काढावी लागली तर 1523 गर्भवतींच्या हातात कोयता महिला ऊसतोड कामगारांचं धक्कादायक वास्तव उघड

बीड: बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांबाबत आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून स्तब्ध करणारे वास्तव समोर आले आहे. ऊसतोडीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिला मजुरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या महिलांचे केवळ कामाचे हाल नव्हे, तर आरोग्यही धोक्यात आले आहे.

जिल्ह्यात 2024 च्या दिवाळीच्या सुमारास जवळपास 1 लाख 75 हजार ऊसतोड मजूर ऊसतोडीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगणासारख्या परराज्यात गेले होते. यामध्ये 78,476 महिला मजूर आणि 96,617 पुरुष मजूर यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि परत आल्यानंतर सर्वांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीतून जे निष्कर्ष समोर आले ते अत्यंत धक्कादायक आहेत.

हेही वाचा: 'लाडक्या बहिणी आता सरकारला नकोशा वाटतात'; हाकेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

843 महिलांची ऊसतोडीपूर्वी गर्भपिशवी काढली

आरोग्य तपासणीतून असे समोर आले आहे की, 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली. यामध्ये 30 ते 35 वयोगटातील 477 महिलांचा समावेश आहे. या शस्त्रक्रिया प्रामुख्याने खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या असून, 279 शस्त्रक्रिया खासगी ठिकाणी झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामागे महिलांना मासिक पाळीत होणारा अत्याधिक रक्तस्त्राव, पोटदुखी, जंतुसंसर्ग आणि इतर त्रास कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने मात्र सांगितले की, शस्त्रक्रियेसाठी महिलांकडून लेखी संमती घेतली गेली असून, काही प्रकरणांमध्ये सरकारी डॉक्टरांची परवानगी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भपिशवी काढल्या जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

गर्भवती महिलांनाही थांबवले नाही, कोयता हाती घेऊन ऊसतोड

आरोग्य तपासणीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली की, 1,523 महिला गर्भवती असतानाही ऊसतोडीसाठी फडात उतरत होत्या. त्यांच्या पोटात बाळ आणि हातात कोयता अशी भयावह अवस्था होती. या सर्व महिलांची नोंद ‘माता व बाल संगोपन पोर्टल’ वर करण्यात आली असून, त्यांचे वैद्यकीय निरीक्षण सुरू आहे.

वाढत्या आरोग्यविषयक समस्या 

अहवालानुसार 3,415 महिलांना लोह, बी-12 आणि फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता, थॅलेसेमिया, व रक्तक्षय आढळून आला. यामध्ये 73 महिलांना तीव्र रक्तक्षय असल्याचे निदर्शनास आले. या सर्व महिलांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा: जामखेडमध्ये लघुशंकेवरून वाद; तिघा अज्ञातांकडून गोळीबार, युवक जखमी

ही परिस्थिती केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर सामाजिक आणि मानवी हक्कांचा प्रश्न आहे. ऊसतोडीच्या नावे महिलांच्या शरीरावर, मातृत्वावर आणि आयुष्यावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे.


सम्बन्धित सामग्री