मुंबई : वर्षा बंगल्यावर महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनाची बैठक पार पडली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित होते. तर काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला व्हिडिओ कॉनफर्सिंगद्वारे उपस्थित होते. 6 डिसेंबरला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी ही महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशातील विविध ठिकाणाहून त्यांचे अनुयायी दादर येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. बाबासाहेबांच्या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी ही बैठक घेण्यात आली. दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीचा आढावा घेतला. तसेच काळजीवाहू उपमुख्यमंत्र्यांनीही व्हिडिओ कॉनफर्सिंगद्वारे बैठकीचा आढावा घेतला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष तयारी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, बेस्ट, एसटी यांची परिवहन व्यवस्था, सीसीटीव्हीची व्यवस्था, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.