Wednesday, August 20, 2025 10:28:19 PM

SSC Exam Paper Leak: दहावी पेपर फुटी प्रकरण, पोलिसांची कारवाई, 3 जणांना बेड्या

जालन्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. तेव्हा पोलिसांनी या गंभीर प्रकरणी तातडीने तपास करून तिघांना अटक केली आहे.

ssc exam paper leak  दहावी पेपर फुटी प्रकरण पोलिसांची कारवाई 3 जणांना बेड्या
SSC Exam Paper Leak: दहावी पेपर फुटी प्रकरण, पोलिसांची कारवाई, 3 जणांना बेड्या

जालना - राज्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात होताच पहिल्याच दिवशी मोठा गंभीर प्रकार उघडकीस आला. जालन्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. तेव्हा पोलिसांनी या गंभीर प्रकरणी तातडीने तपास करून तिघांना अटक केली आहे.

काल गुरुवारी (दि. 21 फेब्रुवारी) दहावी परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता मराठी विषयाची परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जालना शहरातील एका सीएससी केंद्रावर या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची झेरॉक्स काढली जात असल्याचे निदर्शनास आले. झेरॉक्स झालेल्या उत्तरपत्रिका काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्याचं देखील समजते.

हेही वाचा - कपाळावरील चंद्रकोरचे वैशिष्ट्ये तुम्हाला माहितीय का?

पेपरफुटीचा हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांनी याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर बदनापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कर्मचारी आणि सीएससी केंद्र चालकाचा समावेश आहे.

घटनेची गंभीर दखल घेत जालना जिल्हा प्रशासनाने तत्काळ तपास सुरू केला. शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार संबंधित परीक्षा केंद्रावरील प्रशासन बदलण्यात आले आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या केंद्रांना परीक्षा केंद्र म्हणून रद्द करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Jalna : मध्यरात्री भीषण दुर्घटना, जालन्यात वाळूखाळी दबल्याने ५ मजुरांचा जागीच मृत्यू

 

शिक्षणमंत्री काय म्हणाले ?

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पेपरफुटीच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘राज्यात काही ठिकाणी कॉपी आणि गैरप्रकार उघडकीस आले आहेत. कॉपी पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली ते केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्याच बरोबर यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली आहे. त्या केंद्रावरील प्रशासन देखील बदलण्यात आले आहे. कॉपी पुरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ते केंद्र दहावीच्या परिक्षेसाठी रद्द केले जाईल शिक्षण मंडळ परीक्षांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.’

सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्रश्नपत्रिका फुटली कशी आणि कोणाच्या संगनमताने हा प्रकार घडला, याचा शोध घेतला जात आहे.  

 


सम्बन्धित सामग्री