Thursday, August 21, 2025 02:53:08 AM

Navi Mumbai: इमॅजिका पार्कमध्ये शाळेच्या सहलीदरम्यान 8 वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी मुंबईतील एका पालिका शाळेच्या सहलीदरम्यान इमॅजिका पार्कमध्ये आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

navi mumbai इमॅजिका पार्कमध्ये शाळेच्या सहलीदरम्यान 8 वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईतील एका पालिका शाळेच्या सहलीदरम्यान इमॅजिका पार्कमध्ये आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शाळेच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नवी मुंबईतील एका पालिका शाळेने विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन केले होते. सहलीदरम्यान 8 वीतील विद्यार्थ्याला अचानक त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, मुलाचा मृत्यू उष्माघाताने किंवा कोणत्यातरी आरोग्यसंबंधी कारणाने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.

शाळेच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर शाळेच्या प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत. नियमांनुसार, 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली आयोजित कराव्यात, ज्या त्यांच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक ज्ञानाला चालना देतील. मात्र, इमॅजिका पार्कसारख्या थीम पार्कला सहल नेण्यात आली, यावर अनेक पालकांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा: Pune: धक्कादायक! शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा थरार

नियमांचं उल्लंघन?
राज्य शासनाने शालेय सहलींसाठी ठराविक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, शाळांनी शैक्षणिक उपयुक्तता असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेले पाहिजे. मात्र, इमॅजिका पार्क ही मनोरंजनासाठी प्रसिद्ध जागा असल्याने शाळेने नियमांचा भंग केल्याचा आरोप होत आहे.

शासनाकडून चौकशीचे आदेश
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. शाळेने नियमांची पायमल्ली केली का? सहलीदरम्यान सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पाळल्या होत्या का? या सगळ्या मुद्द्यांची चौकशी केली जाणार आहे.

मुलाच्या कुटुंबीयांची न्यायाची मागणी
मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी शासनाने कडक नियम लागू करावेत, अशी मागणी केली जात आहे.

या दुर्घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शाळेच्या सहलींच्या सुरक्षिततेवर नवा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
 


सम्बन्धित सामग्री