शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काल एक वक्तव्य केलं आणि सर्वत्र चर्चेला उधाण आलं. त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खलबतं सुरु झाली. ते वक्तव्य होत ठाकरे गटासंदर्भात. एका काळात ठाकरे गटासाठी काम करणाऱ्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटासंदर्भात मोठा खुलासा केला. मात्र त्याच हे वक्तव्य त्यांना चांगलाच भोवल.
'ठाकरे गटाला 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं' असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं होत. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. आधीच ठाकरे गटातून अनेक जण बाहेर पडत असल्याने उद्धव ठाकरेंचे टेंशन वाढले आहे. त्यातच आता नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केल्यानं सर्वत्र चर्चेला उधाण आलं. मात्र या वक्तव्य नंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा: Mahadev Munde Case: नवऱ्याची हत्या; पत्नी उपोषणावर ठाम
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केल्याचं अंधारेंनी म्हटलंय. सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय.
नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने नीलम गोऱ्हे यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन केले.'नीलम गोऱ्हे हाय हाय', टायरवाल्या काकू, अशा जोरदार घोषणाबाजी करत नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे सेनेच्या महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन केले. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर आता सुषमा अंधारे नीलम गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.