Thursday, August 21, 2025 02:14:36 AM

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरू होणार? तारीख आली समोर

कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे, मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरू होणार तारीख आली समोर

मयुरी देवरे. मुंबई: कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ते म्हणजे लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे, मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती. या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता लवकरच मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.

कोल्हापूरमधील अनेक लोक कामासाठी मुंबईला ये-जा करत असतात. तसेच मुंबईतील अनेक पर्यटक कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संख्या जास्त आहे. मात्र रेल्वेची चांगली कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे, 'या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात यावी', अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आता या मार्गावर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. सध्या कोल्हापूर-पुणे या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहे. ही मिनी वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस धावते. या ट्रेनला 8 डब्बे असून यात एसी चेअर कार आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचाही समावेश आहे.

हेही वाचा: दादर अन् गिरगावात लागले काका-पुतण्याचे फलक

कधी सुरू होणार वंदे भारत ट्रेन?

'मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन कधीपासून सुरु होणार?', असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 15 दिवसांत या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, 'ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल. लवकरच तिचे वेळापत्रक जाहीर होईल'. हे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर या मार्गासाठी किती भाडे असेल याची माहितीही समोर येणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री