छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना त्यांच्या पत्नीने मित्राच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. कटके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी सारिका हिने आपल्या आई, भावासह घरातील मोलकरीण आणि मित्र विनोद उबाळेच्या मदतीने हा कट रचला होता. जादूटोणा, विषप्रयोग आणि जातीवाचक शिवीगाळ करत पतीला त्रास देण्याचे अनेक प्रकार घडले. एवढेच नव्हे, तर पिस्तूल रोखून त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी विनोद उबाळे हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती मिळाली आहे.
देवेंद्र कटके यांच्या तक्रारीनुसार, 2000 साली त्यांनी सारिका देशमुख हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर पत्नीच्या वर्तनात मोठा बदल झाला. अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासाठी हट्ट धरल्याने दोघांमध्ये वाद झाले. 2013 मध्ये कटके उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नत झाल्यानंतरही सारिकाच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. ती मुलांशी आणि कटके यांच्याशी उद्धटपणे वागत होती. 2015 मध्ये तिच्या एका कृत्यामुळे कटके यांना मोठा धक्का बसला, परंतु सासरच्या माफीनंतर त्यांनी प्रकरण मिटवले. 2019 मध्ये कोविड काळात कटके हे मुंबईत ड्यूटीवर असताना, सारिका आणि लहान मुलाला संभाजीनगरातच ठेवले होते. 2021 मध्ये तिच्या हट्टामुळे कटके यांनी जालना येथे तिला ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिले, ज्याचा संपूर्ण खर्च त्यांनीच केला. शाळेजवळच विनोद उबाळेचे हॉटेल असल्याने तो सारिकाचा जवळचा मित्र बनला.
हेही वाचा: जेलमध्ये राडा! वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण
2023 मध्ये कटके यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) म्हणून बदली झाली, तेव्हापासून सारिकाचे वर्तन अधिक संशयास्पद झाले. त्यांच्या कारला बसवलेल्या जीपीएसमुळे ती नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळ्या मार्गाने जात असल्याचे कटके यांना आढळले. 3 मार्च रोजी त्यांनी लोकेशन ट्रॅक करत केम्ब्रिज चौकाजवळ तिच्या कारला वेगळी कार उभी असल्याचे पाहिले. ती कार विनोद उबाळेची असल्याचे त्यांना माहिती होते. विचारणा केल्यावर उबाळेने जातीवाचक शिवीगाळ करत पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर देवेंद्र कटके यांनी पत्नी, तिच्या कुटुंबीयांसह विनोद उबाळेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायदा, जिवे मारण्याचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम, आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई सुरू असून, सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील पुढील तपास करत आहेत.