Putin On Multipolar System: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी जागतिक राजकारणावर महत्त्वपूर्ण भाष्य केले. चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुतिन यांनी 'एकध्रुवीय जग' आता अस्तित्वात राहू नये आणि जागतिक स्तरावर 'बहुध्रुवीय व्यवस्था' निर्माण झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. पुतिन म्हणाले की, 'एकध्रुवीय जग अन्याय्य आहे. प्रत्येक राष्ट्राला समान अधिकार असणे आवश्यक आहे. कोणीही दुसऱ्यापेक्षा जास्त समान नसावे. जग बहुध्रुवीय असले पाहिजे आणि त्यात सर्व घटक समानतेने वागले पाहिजेत.' त्यांनी यावेळी ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) या आंतरराष्ट्रीय संघटनांना या दृष्टिकोनासाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून अधोरेखित केले.
भारत आणि चीनसारख्या आर्थिक महासत्तांचा उल्लेख करताना पुतिन यांनी स्पष्ट केले की आर्थिक सामर्थ्याचा वापर राजकीय किंवा सुरक्षेवर वर्चस्व गाजवण्यासाठी होऊ नये. भारत आणि चीन आर्थिक दिग्गज आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही की ते राजकारणात किंवा सुरक्षेत अधिराज्य गाजवतील. सर्वांना समान हक्क असले पाहिजेत, असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - India Visa Policy: व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश? 'या' देशातील नागरिकांसाठी नवा नियम
युक्रेन संघर्षामुळे रशियावर पश्चिमेकडून आलेल्या निर्बंधांचा आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या टॅरिफ धोरणांचा संदर्भ देत पुतिन यांनी अप्रत्यक्ष टीका केली. विशेषतः भारत आणि चीनवर अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा उल्लेख करत त्यांनी जागतिक आर्थिक अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली. आपल्या चीन दौऱ्याचा आढावा घेताना पुतिन यांनी त्याला 'अत्यंत सकारात्मक' असे म्हटले. सर्व सहभागींनी स्वीकारलेले दस्तऐवज दूरदर्शी आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेखही केला.
हेही वाचा - Donald Trump तात्यांना अहंकाराचा वारा! म्हणे, अमेरिकाच भारी.. अमेरिकेशिवाय जगात सगळं शून्य!
पुतिन यांच्या या वक्तव्याने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, रशिया आता बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेच्या दिशेने प्रयत्नशील आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या वर्चस्वाला आव्हान देत सर्व राष्ट्रांना समान अधिकार मिळवून देण्याच्या या संदेशाला आंतरराष्ट्रीय समुदायात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.