मुंबई : पक्षात क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैव असल्याचे वक्तव्य केल्यामुळे आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव नाराज आहे का? अशा नव्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
जाधव काय म्हणालेत?
पक्षात क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैव. बाळासाहेब असताना शिबिरांमधून मला भाषण करायची संधी मिळायची. जनतेशी संवाद साधताना खोटेपणा नसतो. त्यामुळे लोकांना ते भावतं. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला कोणी ना कोणी आडवं आलं. त्याची अनेक कारणं आहेत, महाराष्ट्रात मला मानणारा एक वर्ग आहे. याचं माझ्यासारख्या समान्य माणसाला अप्रूप आहे.
हेही वाचा : धस यांच्या भेटीला राजकीय संशयाचं वलय; विरोधकांकडून जोरदार निशाणा
जाधव यांच्या या वक्तव्याबाबत महायुतीच्या नेत्यांनी लागलीच दखल घेतली आहे. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची जबाबदारी असलेल्या उदय सांमत यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीचा सूर पाहत शिवसेनेकडे आणखी आमदार येणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आहे. भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी भास्कर जाधवांचे कौतुक केलं आहे.भास्कर जाधव यांनी नाराजीचा सूर आळवताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी ते नाराज नसल्याचा दावा करण्यास सुरूवात केली आहे.
जाधवांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त करताच कोकणात विशेषतः रत्नागिरीत शिल्लक असलेला एकमेव नेता आपल्याच गटात राहावा यासाठी ठाकरे गटाचे नेते एकवटले आहेत. यांच्याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेणार असल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितलं आहे. 2004 साली भास्कर जाधव यांना मातोश्रीवर अनेक तास ताटकळत ठेवलं होतं. त्या रागातून त्यांनी त्यावेळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलं होतं. तब्बल 15 वर्षांनी त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. आता ते पुन्हा नाराजीचा सूर लावत असल्याने जाधव ठाकरे गट सोडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.