Thursday, August 21, 2025 02:13:56 AM

मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; सर्वस्तरातून रूग्णालयावर ताशेरे

सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय वादात सापडले आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूने सगळीकडून दीनानाथ रूग्णालयावर ताशेरे ओढले जात आहेत.

मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू सर्वस्तरातून रूग्णालयावर ताशेरे

पुणे : सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय वादात सापडले आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूने सगळीकडून दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर ताशेरे ओढले जात आहेत. भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे हिला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. 

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने पुण्यात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने त्या महिलेचा खून केला असल्याचा आरोप त्यांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर केला आहे. तसेच प्रशासनावर खुनाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.

हेही वाचा : आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना; गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी काय म्हणाले?

पुढे ठोंबरे म्हणाल्या, हॉस्पिटलच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे. या घटनेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालय सर्वस्वी जबाबदार आहे.  यांचे सगळे परवाने रद्द करा. हॉस्पिटलला मिळणारी सरकारी मदत बंद करा. रुग्णालयाच्या सगळ्या परवानग्या रद्द करून त्यांना दंड लावणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री कक्षा आणि आरोग्य कक्षातून देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन गेला होता. तरी मुजोरपणा कमी झाला नाही. हे हॉस्पिटल खर्चाची वाढीव बिल देत आहे.रुग्णांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.  भिसे हिचे नातेवाईक पैसे भरायला तयार होते.  यासाठी खूप वेळ गेला

पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. भिसेंच्या पत्नीचे तुम्हाला शाप लागतील असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यात गर्भवतीचा करुण अंत, फडणवीस नेमकं करतायंत तरी काय? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. गोरगरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय तडफडून मरत आहेत अशी भूमिका राऊतांनी मांडली आहे. तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अनेक धर्मादाय रुग्णालय सेवा देत नाहीत. धर्मादाय रुग्णालयामध्ये आरोग्यदूत नेमणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. 
 


सम्बन्धित सामग्री