Gold Rate Today: राज्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. घरोघरी गणराया विराजमान झाले असून या उत्सवी वातावरणात दागिने खरेदीकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वळतो. परंतु या आनंदात सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना मोठा विचार करायला लावला आहे.
आज, 2 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या या दरामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, सध्या खरेदी करावी की थांबावं?
हेही वाचा: Manoj Jarange Patil Maratha Protest : 'मेलो तरी हटणार नाही, काय व्हायचंय ते होऊ दे'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
सोन्याचा दर पाहिला तर 24 कॅरेट 10 ग्रॅमसाठी तब्बल ₹1,06,090 मोजावे लागत आहेत. केवळ एका दिवसात या दरात ₹210 ची वाढ झाली आहे. 100 ग्रॅमसाठी किंमत आता थेट ₹10,60,900 वर पोहोचली आहे. म्हणजेच सणासुदीत थोडंफार गुंतवणूक करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांचा विचार केला तर 10 ग्रॅमचा दर ₹97,250 इतका झाला आहे. या किमतीत ₹200 ची वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांना आता 100 ग्रॅमसाठी ₹9,72,500 एवढा खर्च करावा लागणार आहे. पारंपरिकरीत्या लग्नसराई, मुंज अथवा धार्मिक कार्यक्रमात 22 कॅरेटचे दागिने अधिक प्रमाणात खरेदी केले जातात. त्यामुळे या वाढत्या किमतींचा थेट परिणाम सर्वसामान्य खरेदीदारांवर होतोय.
18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ दिसून येतेय. आजच्या घडीला 10 ग्रॅमसाठी ₹79,570 मोजावे लागतील. यात ₹160 ची भर पडली आहे. तर 100 ग्रॅमसाठी दर ₹7,95,700 इतका झाला आहे. कमी कॅरेटच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी देखील ही वाढ काहीशी खिशाला जड जाणारी आहे.
हेही वाचा: Sudan Landslide: सुदानमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झाल्याने संपूर्ण गाव उद्ध्वस्त, 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू
फक्त सोनं नव्हे तर चांदीचाही दर सध्या वेगाने वाढतोय. 1 ग्रॅम चांदीची किंमत ₹126 नी वाढून 1 किलोसाठी तब्बल ₹1,26,100 पर्यंत पोहोचली आहे. पारंपरिकरीत्या गौरी-गणपतीसाठी चांदीचे दागिने, भांडी व पूजेच्या वस्तू मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांनाही या वाढत्या किमतींचा फटका बसणार आहे.
सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदी हा केवळ शौक नसून परंपरेचाही एक भाग मानला जातो. गणेशोत्सवात ‘नवा दागिना घरात आणावा’ अशी परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. पण सध्या गगनाला भिडलेले दर पाहता अनेकांना दागिने खरेदी पुढे ढकलावी लागण्याची शक्यता आहे.
सोनं हे गुंतवणुकीचं सुरक्षित साधन मानलं जातं. त्यामुळे दर वाढले तरी खरेदी थांबत नाही, फक्त प्रमाण कमी होतं. बाजारतज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचा दर आणि आर्थिक अस्थिरता यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे.
एकंदरीतच, या वर्षीच्या गणेशोत्सवात लोकांच्या उत्साहाला सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींनी आव्हान दिलं आहे. आता पुढील काही दिवसांत दर स्थिर होतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.