Thursday, August 21, 2025 12:07:30 AM

आता प्रदूषित पाण्यावर तोडगा निघणार; महापालिका उभारणार 7 मलजल केंद्रे

मुंबईमध्ये कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक पाण्याचं काय करायचं ही एक समस्याच राहिलीये. पण आता यावर तोडगा निघणार आहे.

आता प्रदूषित पाण्यावर तोडगा निघणार महापालिका उभारणार 7 मलजल केंद्रे

मुंबई: मुंबईमध्ये कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक पाण्याचं काय करायचं ही एक समस्याच राहिलीये. पण आता यावर तोडगा निघणार आहे.  कारण आता या रासायनिक आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे एकूण 7 केंद्र मुंबई मनपा उभारतेय. मुंबईमध्ये दररोज जेवढ पाणी पिण्यासाठी वापरलं जातं त्याच्या 80 ते 90 टक्के प्रदूषित पाणी हे समुद्रात सोडलं जातं. मुंबईत दररोज तयार होणाऱ्या अडीच हजार एमएलडी इतक्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे एकूण 7 केंद्र मुंबई महापालिकेकडून उभारले जात आहेत. जवळपास 50 ते 60 टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित कामाला वेग आला आहे. 

मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एकूण 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. या सात प्रकल्पांद्वारे मिळून दररोज एकूण 2 हजार 464 दशलक्ष लीटर (246.40 कोटी लीटर) मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. नवीन मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता व सागरी जीवनामध्ये सुधारणा होणार आहे. या सातही मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची प्रारंभीची संरचनाविषयक कामे होऊन उभारणीने आता वेग घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने मुंबई महानगरात एकूण 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. 

हेही वाचा: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार?

मलजल प्रक्रिया केंद्र प्रतिदिन क्षमता

वरळीमध्ये 500 दशलक्ष लीटर प्रतिदिन

 वांद्रे येथे 360 दशलक्ष लीटर प्रतिदिन

 मालाडमध्ये 454 दशलक्ष लीटर प्रतिदिन

घाटकोपरमध्ये 337 दशलक्ष लीटर प्रतिदिन 

धारावीमध्ये 418 दशलक्ष लीटर प्रतिदिन

भांडुपमध्ये 215 दशलक्ष लीटर प्रतिदिन 

वर्सोवा येथे 180 दशलक्ष लीटर प्रतिदिन 

याप्रमाणे एकूण 7 केंद्र उभारणीची कार्यवाही वेगाने सुरू आहे. 

वरळी, वांद्रे, धारावी, वेसावे (वर्सोवा), मालाड, भांडुप व घाटकोपर या 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज 246.40 कोटी लीटर अर्थात 2 हजार 464 दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची आहे. 

अशा प्रकारे होणार प्रक्रिया

या प्रकल्‍प अंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहे. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती देखील केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे. मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची स्थापत्यविषयक प्रारंभिक कामे पूर्ण झाल्याने आता पुढील बांधकामाची स्थापत्य कामे वेगाने सुरु झाली आहेत. सन 2025 आणि 2026 या दोन्ही वर्षांमध्ये पावसाळ्यातही कामे होतील. अशारितीने नियोजन करण्यात आले आहे. हे प्रकल्प ठरवलेल्या कालावधीत पूर्ण होतील. स्थापत्य कामांनी पकडलेला वेग लक्षात घेता संयंत्रांची मागणी, खरेदी या प्रक्रिया देखील सुरु करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर स्थापत्य कामे, संयंत्रे असूनही कामगार, कर्मचारी यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होणार आहे.

मुंबईतील सांडपाणी हे शुद्ध करून जर वापरले तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन ते चार धरणाइतका पाणीसाठा या प्रकल्पातून मिळेल. त्यामुळे मुंबईमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होईल असे या प्रकल्प मागील उद्दिष्ट आहे. तेव्हा येत्या काळात हा प्रकल्प सुरू होऊन मुंबईकरांचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न हा निकाली लागेल असे चित्र सध्या दिसत आहे.
 


सम्बन्धित सामग्री