मुंबई : मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असताना अखेर बुधवारी पावसानं उसंत घेतली आहे. आज सकाळपासूनचं धो-धो पडणाऱ्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुन्हा तुफान पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत पावसानं विश्रांती घेतली असून काही भागांत हलक्या सरी बरसत आहेत. परिणामी, आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात खबरदारी म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून ठाण्यातील शाळा-कॉलेजदेखील आज बंद ठेवण्यात आले आहेत. शिवाय ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरीसाठीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा : Kolhapur Panchganga River : पंचगंगेने इशारा पातळी गाठली; राधानगरी धरणाचे 5 दरवाजे बंद, जिल्ह्यात 41 मार्गांवर पाणी
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी गेल्या 48 तास रेड अलर्ट देण्यात आला होता. तसाच मुसळधार पाऊसही पडला. मात्र सहानंतर हा अलर्ट कमी करत ऑरेंज केला आहे. मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली. आज मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडसाठी आजदेखील रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसेच नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर विदर्भात आज यलो अलर्ट दिला आहे.