Sunday, August 31, 2025 01:34:05 PM

Mumbai Railway Megablock : गणरायाच्या दर्शनाला मेगाब्लॉकचं विघ्न! रविवारी या मार्गांवरील सेवा धिम्या गतीनं; वाचा मुंबई लोकलचं वेळापत्रक

रविवार, 31 ऑगस्ट रोजी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार हे निश्चित.

mumbai railway megablock  गणरायाच्या दर्शनाला मेगाब्लॉकचं विघ्न रविवारी या मार्गांवरील सेवा धिम्या गतीनं वाचा मुंबई लोकलचं वेळापत्रक

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉग घेण्यात आला आहे. सध्या गणेशोत्वाची धामधुम मुंबई शहरात सुरू असून त्यातच मराठा आरक्षणासाठी आंदोलकदेखील मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच रविवार, 31 ऑगस्ट रोजी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार हे निश्चित. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघर येथून दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी लोकं मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने येतात. त्यातच रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सहकुटुंब मुंबईकर घराबाहेर पडण्याच दाट शक्यता आहे. मात्र अशातच सोयीची ठरणारी लोकल त्यांच्या प्रवासात विघ्न आणू शकते. शिवाय आझाद मैदान येथील मराठा आंदोलकांनाही उद्यापर्यंतही परवानगी आंदोलनासाठी दिली असून त्यांचे आंदोलन संपुष्टात आल्यास ते आपापल्या गावी परतीचा मार्ग धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा सर्वाधिक सोयीही आहे. मात्र याच मार्गांवर मेगाब्लॉक असल्याचे आंदोलकांचीही गैरसोय होऊ शकते. 

हेही वाचा : Manoj Jarange : 'जेवण-चहाची दुकानं बंद, शौचालयाला कुलूप, तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार'; मनोज जरांगेंचा सरकारवर घणाघात

पाहुया कुठे, कधी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे 31 ऑगस्ट 2025 रोजी उपनगरीय लाईनवर विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी खालीलप्रमाणे मेगा ब्लॉक राबविण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर 10.55 वाजेपासून ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहील. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 10.48 वाजता ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन फास्ट लाईनवर वळविण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील व नंतर विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धिम्या लाईनवर वळविण्यात येतील.

घाटकोपर स्थानकातून 10.19 वाजेपासून दुपारी 3.52 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान अप फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. 

कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन सेवा 11.10 वाजेपासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत रद्द राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.34 वाजेपासून दुपारी 3.36 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी 10.17 वाजेपासून दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर लाईन गाड्या रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई–कुर्ला–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि पनवेल–वाशी–पनवेल या मार्गांवर विशेष उपनगरी गाड्या चालवण्यात येतील.

हार्बर लाईन प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे–वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल.


सम्बन्धित सामग्री