मुंबई : लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना घडली असून लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन वर्षांची चंद्रा वजणदार हिचा मृत्यू झाला असून तिचा भाऊ 11 वर्षीय शैलू वजणदार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपलेली असल्याचे समजते. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गाडी घातली. मात्र कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध कलम 106, 125 (इ), 281, 184, 187 (भारतीय न्याय संहिता 2023) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीचे महत्व काय ?, या दिवशी हे 5 सोपे उपाय नक्की करा, जाणून घ्या...
गेल्या दहा दिवसांपासून घरगुती, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज, अकराव्या दिवशी भाविका आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाचा उत्सव साजरा केल्यानंतर आधी दीड दिवसांचा, नंतर पाच दिवसांचा, पुढे सात दिवसांचा आणि आज अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गणपती मिरवणूक निघणार असून सर्वत्र बाप्पाच्या नामाचा जयघोष घुमणार आहे.