मुंबई: जगाने 2020 मध्ये सुरू झालेल्या कोविड-19 महामारीचा मोठा फटका सोसला होता. लाखो लोकांचे प्राण गेले, आरोग्य व्यवस्था कोलमडली, अर्थव्यवस्था ठप्प झाली आणि अनेकांच्या आयुष्यावर त्याचा खोल परिणाम झाला. आता, काही वर्षांनी जग पूर्ववत होत असतानाच पुन्हा एकदा आशियात कोरोनाची नवी लाट डोके वर काढत असल्याची गंभीर बाब समोर येतेय.
ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ नोंदवली गेलीय. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने 3 मे रोजी सांगितल्याप्रमाणे, एकाच आठवड्यात रुग्णसंख्या 28 टक्क्यांनी वाढून 14,200 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे ही माहिती जवळपास एका वर्षानंतर देण्यात आली. त्याचवेळी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही 3 टक्क्यांनी वाढली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही वाढ रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आणि व्हायरसच्या नव्या स्ट्रेन्समुळे असू शकते. मात्र सध्या तरी नवे स्ट्रेन्स अधिक घातक असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
हाँगकाँगमध्येही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. तिथल्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या अहवालानुसार, कोविडसाठी पॉझिटिव्ह आलेल्या श्वसन नमुन्यांची संख्या गेल्या वर्षातील सर्वोच्च पातळीवर आहे. गंभीर रुग्ण व मृत्यूंची संख्या वाढून 31 झाली आहे.
फक्त सिंगापूर आणि हाँगकाँगच नव्हे, तर चीन, थायलंडसारख्या देशांमध्येही कोविडच्या नव्या प्रकरणांची वाढ लक्षात आली आहे. चीनमध्ये मे ४ पर्यंतच्या पाच आठवड्यांमध्ये कोविड टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट दुपटीने वाढला आहे. थायलंडमध्ये सोंगक्रान सणानंतर रुग्णसंख्येत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.
पूर्वीच्या लाटांप्रमाणेच या लाटेचा धोका दुर्लक्षित करता येणार नाही. मागील लाटांमध्ये आपण ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स, औषधांचा तुटवडा आणि प्रचंड मानसिक व आर्थिक ताण अनुभवला आहे. अशा पार्श्वभूमीवर, नव्या वाढत्या रुग्णसंख्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सरकारने आणि नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर, नियमित हात धुणे आणि लसीकरण हे उपाय पुन्हा एकदा सुरू ठेवले पाहिजेत. तसेच वरिष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारपण असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.