मुंबई: राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण येण्याची चिन्हं पुन्हा दिसू लागली आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सत्ताधारी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. भाषणादरम्यान त्यांनी मिश्किल अंदाजात म्हटलं, '2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकांवर जाण्याचा स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे.' सभागृहात या विधानानंतर क्षणभर शांतता पसरली, पण लगेचच राजकीय वर्तुळात या विधानाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरु झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. त्यामुळे या विधानाचा राजकीय अर्थ अधिक गडद झाला आहे. विशेष म्हणजे, फडणवीसांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात कोणताही उल्लेख केला नाही, ज्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा:ठाकरे बंधू युतीच्या चर्चेत शिंदेंचा नवा डाव; रिपब्लिकन सेनेसोबत युती, महापालिका रणधुमाळीत नवे समीकरण?
भाजपा आणि शिवसेना यांची जुनी मैत्री सर्वज्ञात आहे. तब्बल 25 वर्षांची साथ, बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या काळात अधिक घट्ट झाली होती. मात्र, 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या संघर्षानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली.
यानंतर अडीच वर्षांतच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपाचे संबंध अधिक ताणले गेले.
आता, फडणवीसांच्या ताज्या विधानामुळे भाजप आणि ठाकरे गटामध्ये नवा पूल तयार होतोय का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.