मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली समाज माध्यमांवर अनेक अफवा पसरवल्या जात असल्यामुळे सामान्य महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात आमदार आदिती तटकरे यांनी पत्रक काढून योजनेबाबत स्पष्टीकरण देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
समाज माध्यमांवर काही व्हिडीओ आणि रील्स व्हायरल झाल्या होत्या, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की योजनेचे अर्ज पुन्हा तपासले जातील आणि अनेक महिलांचे अर्ज रद्द केले जातील. या अफवांमुळे अर्जदार महिलांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी एक्स (ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पत्रक शेअर करून महिलांना दिलासा दिला आहे.
पत्रकात आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याच्या महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जे अर्जदार महिलांना योग्य ते लाभ देण्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही.
तटकरे यांनी असेही सांगितले की, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओ आणि रील्सवर विश्वास ठेवू नये. समाज माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. योजनेशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही तटकरे यांनी नमूद केले आहे.