Monday, September 01, 2025 08:56:10 AM

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण; आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणामुळे शरद पवार गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणामुळे शरद पवार गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आमदार रोहित पवार आणि इतरांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यासह, शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच, या प्रकरणात आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा: शनिशिंगणापूर देवस्थानावर भ्रष्टाचाराचा कोप ; CM देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये

काय म्हणाले रोहित पवार?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी सकाळी X वर पोस्ट करून म्हटले की, 'कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…! विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे… महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे! #सत्यमेवजयते #जय_संविधान'. 

 

 

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासोबतच, लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे पार पाडल्याचेही आरोप आहेत. बारामती अ‍ॅग्रो कंपनीमार्फत फसवणुकीचे आरोप आहेत आणि यापूर्वीही बारामती अ‍ॅग्रोची 50 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यापूर्वी, ईडीने रोहित पवारांची दोनदा चौकशी केली होती. या पुरवणी आरोपपत्रामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढतील असे मानले जात आहे. हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (MSCB) 25,000 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. या प्रकरणात विविध राजकीय नेते आणि बँक संचालकांवर अनियमितता आणि गैरव्यवहारांचे आरोप आहेत.


सम्बन्धित सामग्री