अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेतील नेत्यांवरचा वचक कमी झाला असून गल्लीतले टपोरी छाप पोरं जसे वागतात तसे सत्तेतले अनेक नेते आता वागायला लागले असून मंत्रिमंडळाचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्र्यांनी मस्तवाल नेत्यांना लगाम घालण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांची आज लातूरातील रुग्णालयात भेट घेऊन घेतल्यानंतर ते 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वारंवार शेतकऱ्याबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याची जखम राज्यातील शेतकऱ्याच्या मनावर झाली असून त्याचा बदला शेतकरी घेणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीच्या विरुद्ध दिशेने या महाराष्ट्राची वाटचाल सध्या सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातला सुज्ञ माणूस हे खपवून घेणार नाही. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री चुकीचं वागत असतील तर त्यांच्यावर लगाम घालणं हे मुख्यमंत्र्यांचे काम असून महाराष्ट्राला संवेदनशील कृषिमंत्री हवा आहे. कोणाला कृषीमंत्री करावं हे शेतकरी सांगणार नाही. परंतु तो शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असावा एवढीच मागणी असल्याचे सांगून चळवळीतील कोणत्याही कार्यकर्त्यावर हात उचलण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे, अशी आमची पुढील लढाई असणार असल्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 'जय महाराष्ट्र'शी बोलताना स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: Jalgaon Crime: लेडी सिरीयल किलरचा थरार; दोन महिलाचा खून करुन तिसरी थोडक्यात वाचली
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे. ते सातत्याने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसले. यामुळेच शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नेत्यांना, मंत्र्यांना लगाम घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.