मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेली लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना दरमहा 1500 रूपये दिले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे अतिरिक्त पैसे देण्यात आले. आता लाडक्या बहिणींना डिसेंबर मिळणाऱ्या पैशांची प्रतीक्षा लागली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना लाडकी बहीण योजनविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांची पूर्तता करण्यासाठी 35 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रूपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहीणींना मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. 1500 रूपयांवरून 2100 रूपये दरमहा महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहीणींच्या डिसेंबर महिन्यातील 2100 रूपयांकडे नजरा लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट सगळ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आले होते. मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींची धाकधूक वाढली आहे. एका घरातील दोनपेक्षा अधिक महिलांना मिळणारे पैसे बंद होणार आहेत. तसेच घरात चारचाकी गाडी, आयकर भरणारे यांना योजनेचा लाभ घेता येत नव्हता. अशा महिलांना लाभ मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.