मुंबई: महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा राजकीय वादाला उधाण आलं आहे. काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या वादानंतर, आज विधानभवनाच्या लॉबीत दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले.
या वादावादीत परिस्थिती तणावपूर्ण झाली असताना, सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत गोंधळ थांबवला. मात्र या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. 'हल्ला कोणी केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आमच्यावर हल्ला झाला हे स्पष्ट आहे,' असं आव्हाड म्हणाले.
'विधानभवनात जर गुंडांना प्रवेश असेल आणि ते आमदारांवर हल्ले करत असतील तर आमची सुरक्षा कुठे आहे? मला आई-बहिणीवरून अश्लील शिव्या देण्यात आल्या. बाहेर मोकळी हवा खाण्यासाठी गेलो असता हे सगळे मला मारण्यासाठीच आले होते. आमदार सुरक्षित नसतील तर आम्ही विधानभवनात राहायचं तरी कशासाठी?” असा संतप्त सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.
हेही वाचा: 'फडणवीसांची ऑफर म्हणजे एखादी टपली किंवा टोमणा' ;राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
त्याचवेळी गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्वतःची भूमिका स्पष्ट करताना, 'मला काही माहिती नाही. तिथे कोण आहे, काय घडलं हे तपासा,' असे विधान केले. मारामारीप्रकरणी आपण अनभिज्ञ असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
या सगळ्या प्रकारावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'हे लोक समर्थक आहेत की गुंड? जर विधानभवनात गुंडगिरी पोहोचली असेल तर याचा अर्थ काय? प्रवेश कसा मिळाला आणि पास कोण देतो, याची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेमुळे विधानभवनात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. गृहमंत्र्यांनी संबंधितांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका विरोधकांनी घेतली आहे.
हेही वाचा:ठाकरेंनी शिंदेंना मांडीवर घेऊन बसायला हवं होतं का?; राऊतांचा खोचक टोला
विधानभवनातच जर अशा प्रकारे गोंधळ आणि गुंडगिरी झाली, तर लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असा सूर आता राजकीय वर्तुळात उमटत आहे.