Wednesday, August 20, 2025 02:05:31 PM

यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती

पुण्यातील यवत दंगलीबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती

पुणे: पुण्यातील यवत दंगलीबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. दौंड तालुक्यातील यवतमध्ये समाज माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला होता. एका तरुणाने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट केली. यानंतर यवतमध्ये तोडफोड आणि जाळपोळ झाली. आता यवतमधील दंगल शमल्यावर शरद पवार सक्रिय झाले आहेत. 

यवत दंगलीबाबत शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पवारांनी केली. राज्यात सामाजिक सलोखा राखला जावा. यवत प्रकरण संवेदनशील पणे हाताळलं जावं, अशी अपेक्षा शरद पवारांनी मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली आहे. आता यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमधील यवत येथे आता तणावपूर्ण शांतता आहे. 

एका तरुणाकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. या पोस्टनंतर यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. यवतमधील घटनेची चौकशी करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. कुणीही कायदा हातात घेऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागरिकांना करण्यात आले होते. 

हेही वाचा: Raj Thackeray: मला लाज वाटते, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांचं आवाहन

दरम्यान शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमध्ये दाखल झाले होते. त्यांनी यवतमधील परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. तसेच यवतमध्ये 48 तासांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली. पोस्ट करणारा नांदेडमधून काही वर्षांपूर्वी आला. पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा स्थानिकांशी काहीही संबंध नाही. 30-40 जणांच्या जमावाकडून यवतमध्ये तोडफोड करण्यात आली होती. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे त्यांनी सांगितले. 

यवतमध्ये नेमकं काय घडलं? 
26 जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरात पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळ्याच्या विटंबनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झाले. प्रकरण ताजं असताना तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये तणाव वाढला. जमावाकडून तरुणाच्या घराची तोडफोड केली गेली. यामुळे दोन गटांत तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. गुरुवारी यवतमध्ये गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची हिंदू जन आक्रोश सभा घेतली होती. या भाषणात त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याची अपमान सहन करणार नाही. एका व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दगडाने तोडफोड करतोय, लाथा बुक्क्यांनी मारहाण करतोय. हे महाराष्ट्र सहन करणार नाही असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तसेच शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचे हात कलम करा. हा फक्त शिवरायांच्या पुतळ्यावर नाही तर समस्त हिंदूंवर केलेला आघात आहे असेही त्यांनी सांगितले आहे.  


सम्बन्धित सामग्री