बारामती: महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागामार्फत इंदापूर तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी तब्बल 55 कोटींच्या निधीस मान्यता मिळाली आहे. या निधीमधून संकुलातील विविध कामे, अत्याधुनिक सुविधा, खेळाडूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. हा आनंदाचा क्षण राजकीय अंगणात पोहोचताच मात्र इंदापूरच्या राजकारणाला नव वळण मिळाले आहे.
निधी मंजुरीची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकृतरीत्या दिली. त्यांच्या या भूमिकेचा गौरव करण्यासाठी इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे यांनी शहरातील मुख्य चौकात भरणे यांचे अभिनंदन करणारे भव्य बॅनर लावले. या बॅनरवर निधी मंजुरीचे संपूर्ण श्रेय भरणे यांना देत त्यांना ‘खेळाडूंचा खरा मित्र’ अशी उपाधी दिली.पण इंदापूरचं राजकारण म्हणजे पटकन रंग बदलणारा खेळ. याच अभिनंदन बॅनरच्या समोरच भाजप ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदे यांनी एक वेगळा बॅनर लावला. या बॅनरमध्ये सरळ संदेश 'इंदापूर क्रीडा संकुलासाठी 55 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार' असा बॅनर लावण्यात आलाय.
हेही वाचा: Jitendra Awhad : रामकमलदासला 80 पोरं, एका वर्षात त्याच्या बायकोला तीन पोरं झाली का?; जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगाला थेट प्रश्न
इंदापूर तालुक्यासाठी निधी कोण आणत आहे. इंदापूर तालुक्यात नामदार मंत्री महोदय दत्तात्रय भरणे करोडो रुपयाचा विकास निधी आणून इंदापूरचा कायापालट केला आहे. नामदार दत्तात्रय भरणे कृषी मंत्री होण्याअगोदर क्रीडा मंत्री होते आणि त्याचवेळी त्यांनी इंदापूर क्रीडा संकुलासाठी 55 कोटी 16 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला होता त्याचा जीआर दोन दिवसापूर्वी निघाला आहे. यामुळे काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रवीण माने यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावून काही उपयोग नाही. इंदापूर क्रीडा संकुलासाठीच्या निधीसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचेच पूर्णपणे श्रेय असल्याचे वैभव मासाळ यांनी सांगितले आहे.
राज्यात महायुतीतली ‘गोड’ एकता, पुण्याच्या इंदापूरमध्ये मात्र निधीवरून बॅनर युद्ध. महायुतीच्या सत्तेत राज्यामध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी एकत्र आहेत. पण इंदापूरमध्ये क्रीडा संकुल निधीच्या श्रेयासाठी लागलेल्या बॅनरयुद्धातून मात्र वेगळंच चित्र उभं राहिलं आहे. एका बाजूला राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे यांचे अभिनंदन, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार हे दोन्ही बॅनर समोरासमोर उभे राहिल्याने महायुतीतल्या ‘सहकार्या’त इंदापूरमध्ये परस्परविरोधी सूर दिसून आले आहेत. यावरून राजकीय जाणकारांचे मत भविष्यात दत्तात्रय भरणे यांना इंदापूरमध्ये भाजपकडूनच थेट संघर्षाचा सामना करावा लागू शकतो.
हेही वाचा: Pune News : पुण्यात तीन महापालिका?; अजित पवारांकडून घोषणा, मात्र मुख्यमंत्र्यांनी मांडलं वेगळ मत, म्हणाले...
बॅनरमध्ये ‘भविष्याचा संदेश’?
भाजपच्या आभार बॅनरमध्ये नुकतेच भाजप मध्ये पक्षप्रवेश केलेले प्रवीण माने यांचा फोटो ठळकपणे झळकतोय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा केवळ आभाराचा बॅनर की भविष्यातील राजकीय स्पर्धेची झलक? स्थानिक पातळीवर हे बॅनर स्पष्ट संकेत देतायत की, प्रवीण माने हेच आगामी काळात दत्तात्रय भरणे यांचे थेट राजकीय प्रतिस्पर्धी ठरू शकतात