मुंबई: भाजपा पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे, आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे स्पष्ट झाले आहे. अशातच आता उद्या मुंबईत होणाऱ्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेणार असून हा महाराष्ट्र राजकारणाचा ऐतिहासिक क्षण असणार आहे.
आता या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत पण त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंढरपुरातील संत-महात्म्यांना निमंत्रित करण्यात आले असून, वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी आणि वारकरी पाईक संघाचे सदस्य या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. महायुतीचे सरकार संतांच्या आशीर्वादाने स्थापन झाले आहे, असे मत वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज यांनी व्यक्त केले.
रामकृष्ण वीर महाराज म्हणाले, “राजसत्तेला धर्मसत्तेचा आशीर्वाद मिळणं हे राज्याच्या प्रगतीसाठी शुभ मानले जाते. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर धर्म, संस्कृती, आणि जनतेच्या हितासाठी नवे अध्याय लिहिले जातील, याची खात्री आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून महाराष्ट्रातील संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा संगम आहे. वारकरी महाराजांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक भव्य आणि संतांच्या उपस्थितीमुळे पवित्र होणार आहे.