Sunday, August 31, 2025 01:37:46 PM

Maratha Andolan Azad Maidan : 'मराठा आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचं नियोजन', शरद पवार गटाचा फडणवीस सरकारला टोला

शुक्रवारी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यादरम्यान, मनोज जरांगेंसह मराठा समाजाचे लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत.

maratha andolan azad maidan  मराठा आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचं नियोजन शरद पवार गटाचा फडणवीस सरकारला टोला

मुंबई: शुक्रवारी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यादरम्यान, मनोज जरांगेंसह मराठा समाजाचे लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत. अशातच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, 'मराठा समाजाचे लोक लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, सरकारने त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि पिण्याची कोणतीही सुविधा केली नाही'. रोहित पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

काय म्हणाले रोहित पवार?

'आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल', रोहित पवार म्हणाले. 

पुढे, रोहित पवार म्हणाले की, 'मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!'.

मनोज जरांगे काय म्हणाले?

शुक्रवारी सकाळी 10:30 वाजल्याच्या सुमारास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू झाल्याची घोषणा केली. यादरम्यान, मनोज जरांगेंनी सरकारकडे विनंती केली. ते म्हणाले की, 'सरकारने जी एक दिवसाची परवानगी दिली आहे, ती वाढवून देण्यात यावी'. यासह, जरांगेंनी सरकारला इशारा दिला की, 'जर सरकारने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर अजून मराठे मुंबईत दाखल होतील'. 


सम्बन्धित सामग्री