Wednesday, August 20, 2025 08:35:13 PM

उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजात संवेदनशीलता निर्माण करणं गरजेचं; मनसे नेते अमित ठाकरेंचे मोदींना पत्र

देशभरात भारतीय सैन्याच्या कामगिरीचा जल्लोष साजरा केला जात आहे. देशभरात सुरु असलेल्या या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजात संवेदनशीलता निर्माण करणं गरजेचं मनसे नेते अमित ठाकरेंचे मोदींना पत्र

नवी दिल्ली: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. देशभरात भारतीय सैन्याच्या कामगिरीचा जल्लोष साजरा केला जात आहे. देशभरात सुरु असलेल्या या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 


मनसे नेते अमित ठाकरेंचे मोदींना पत्र:

'आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. याबद्दल मी आपले आभार मानतो. सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचे लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्यांकडे केंद्रित झाले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट आहे. भारतीय सैन्यांच्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे.

आज देशात प्रत्येक घरातून, चौकातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्यांच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कोणत्याही सन्मानापेक्षा मोठे आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचे प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून युद्धविरामाची आहे. म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला आहे, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.

हेही वाचा: मुख्यमंत्री सहायता निधी ठरणार गरजूंसाठी वरदान

या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावे. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा' काढली जात आहे, ते समर्पक वाटत नाही. वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.

त्यासोबतच, सध्याच्या घटनाक्रमाचा विचार करता, देशात काही गंभीर बाबींविषयी अजूनही अनिश्चितता आहे. उदाहरणार्थ, पहलगाममध्ये घडलेला क्रूर दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये २६ निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे. याशिवाय, भारत-पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसांत आपल्या काही नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा, समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं हे अधिक योग्य ठरेल', असे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. 


सम्बन्धित सामग्री