मुंबई: मनोज जरांगे पाटीलांसह लाखो मराठ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानावर आलेले मराठा आंदोलक वैतागून निघून गेले पाहिजे म्हणून सरकारने पाण्याची व्यवस्था बंद केली, स्वच्छतागृहे बंद करण्यात आली, चहा आणि नाश्त्याची दुकाने, उपाहरगृहे बंद ठेवण्यात आली. हे सरकार इंग्रजांपेक्षाही बेक्कार आहे, अशा शब्दात मनोज जरांगेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकतर इथेच जीव देईन किंवा आरक्षण घेऊन जाईन असा निर्धार यावेळ जरांगेंनी केला.
आंदोलकांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह आसपासचा परिसर व्यापला. जरांगे पाटील यांनी शुक्रवारी दहा वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली. पोलिसांनी मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती. परंतु शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे. त्यानंतर जरांगे यांनी जोरदार टीकास्त्र डागलं. ‘पुढील एक-दोन दिवस मी पाणी पित आहे. पण, सरकारने ताणले तर तेही बंद करून कडक उपोषण करेन. तुरुंगात टाकले तर तिथेही मरेपर्यंत उपोषण करेन, गोळ्या झाडल्या तर झेलून मृत्यूमुखी पडेन. पण, तडजोड करणार नाही’, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.
हेही वाचा: Manoj Jarange : 'जेवण-चहाची दुकानं बंद, शौचालयाला कुलूप, तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार'; मनोज जरांगेंचा सरकारवर घणाघात
‘हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने अस्सल डाव खेळावा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे. तुम्ही एक-एक दिवस परवानगी दिली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण होणार आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. आज सिद्ध झाले की, मैदानात आंदोलन करायला देणे किंवा न देणे हे सरकारच्या हातात आहे’ असे जरांगे म्हटले. ‘सरकारने शौचालये कुलूप लावून बंद केली, पाण्याची परिस्थिती तीच आहे. चहाचे, नाश्ता आणि जेवणाची दुकानेही बंद करण्यात आल्याचे समजले. त्यामुळे आंदोलक हे सीएसटीला बसले होते. जेवायला मिळू नये, चहापाणी मिळू नये आणि मराठ्यांनी वैतागून निघून जावे, असे प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
मराठा आंदोलकांबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु मराठ्यांची मुले काही बोलणार नाहीत, ते माज घेऊन नव्हे तर वेदना घेऊन मुंबईला आले आहेत. मी मराठ्यांसाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे. आता मी मरेन किंवा आरक्षण मिळवेन असेही जरांगेंनी म्हटले आहे.